लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी मंदिरात भाविकांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त गुरुवारी (ता. ०९ ) मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे म्हणाले, “माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असून गुरुवारी पहाटे आनंद आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
चिंतामणी गणपती मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कैरी, कोकम, विविध प्रकारचे पेरू, तसेच नारळ, दुर्वा विकण्यासाठी महिला विक्रेत्या व नागरिक बसले होते. यावेळी येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करताना दिसून येत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले आदी विक्रेते दिसून येत होते. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांसह विक्रेत्यांची मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि आगलावे बंधूंच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. देवस्थानच्या वतीने मंदिराबाहेर दर्शन बारी बांधण्यात आली होती तसेच त्यावर छत टाकण्यात आला होता. तसेच मंदिरात फुलांची आरास, डेकोरेशन करण्यात आले होते. भाविकांना दुपारी खिचडी व चिवडा वाटप करण्यात आले.
प्रत्येकवर्षी प्रमाणे यावर्षीही ह.भ.प एकनाथ महाराज तारू यांच्या तर्फे श्री चिंतामणी जन्मोत्सव साप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्वयंभू चिंतामणी भगवंत तसेच महासाधू मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज देव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सर्व व्यवस्थेवर विश्वस्त आनंद महाराज तांबे लक्ष ठेऊन होते.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सायं ७ ते ९ या वेळेमध्ये सुश्राव्य हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर चंद्रोदयानंतर ‘श्री’चा छबिना झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.