पुणे : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर यते आहे. कात्रज चौकातील वाहतूकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. वाहतूकीचा प्रचंड दबाव असल्याने कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम अडकून आहे. यापूर्वी एकदा ते करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी येथील वाहतूकीत बदल केल्याने अभुतपूर्व वाहतूक कोंडी बघायला मिळाली होती. त्यामुळे हे काम सातत्याने पुढे ढकलले जात होते.
आता वाहतूकीचे नियोजन हे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. ३ डिसेंबरपासून हे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकात येणार्या रस्त्यावरील वाहतूकीमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. हे बदल ३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत. कात्रज चौकात जड/अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने) अशा वाहनांना बंदी असणार आहे. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलापासून आणि नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपुल येथे आणि मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपूल येथे प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.
सोलापुरकडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशिन चौकापुढे, मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद असणार आहे.
सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडून कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. तसेच, मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४ वाजेपर्यंत प्रवेश असणार आहे. मात्र, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.