पुणे : पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा नेमहीच प्रयत्नशील असते. परंतु, चित्रं मात्र वेगळं बघायला मिळतं, वाहनचालक अत्यंत बेजबाबदारपणे वाहन चालवत असतात आणि नियम मोडत असतात. अशा पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. आता उलट दिशेने वाहन चालवणाऱ्या लोकांचे वाहन सहा महिने जप्त करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ट्रिपल सिट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि उलट दिशेने येणार्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखेकडून मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात वाहतूक शाखेने सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस अंमलदार कार्यरत असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरावस्था, अरुंद रस्ते यामुळे शहरातील सर्वच भागात वाहतूक कोंडी दररोज होताना दिसते. शहरात भरधाव आणि वाहतूकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून दररोज एक ते दोघांना आपल्या प्राणास मुकावे लागते. त्यामध्ये अनेक जण गंभीर तर काही किरकोळ जखमी होत असतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
अवजड वाहनांना दिवसा असणार बंदी..
शहरात विविध ठिकाणी इमारतीचे बांधकाम, आणि विकास कामे सुरु असून त्यासाठी डंपर, कॉक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरु असते. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात, त्यामुळे वर्दळीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
वाहतूक शाखेने १ ते १६ ऑक्टोबर दरम्यान केलेली कारवाई पुढीलप्रमाणे..
- उलट दिशेने जाणारे वाहनचालक – २१हजार २८५
- ट्रिपल सीट – २ हजार ८७२
- ड्रंक अँड ड्राईव्ह – ५७०
- जप्त वाहने – २१५