पुणे : पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच आता कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कामगार जखमी झाला आहे.
या प्रकरणी सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख एका पेट्रोल पंपावर कामाला आहेत. सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी निघाले असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्यांची अडवणूक करत लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करण्यात आली.
डोक्यात दांडके बसल्याने ते जखमी झाले. झटापटीत चोरट्यांनी शेख यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून पिशवी घट्ट पकडून ठेवली. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच चोरटयांनी धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.