पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात पत्नी नांदायला येत नसल्याच्या करणातून एका व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सौदागर उत्तम काकडे (वय-५१ रा. केशवनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी १९ मे रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक महादेव हरिबा लिंगे (वय-४२) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदागर काकडे आणि त्याच्या पत्नी यांच्यामध्ये वाद झाले होते. दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. याबाबत सौदागर याने मुंढवा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, पत्नीने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन पती दारु पिवून त्रास देत असल्याने त्याच्यासोबत जायचे नाही असे सांगितले होते.
पत्नी नांदायला येत नसल्याने सौदागर चिडला होता. तो वारंवार पोलीस ठाण्यात येऊन पत्नीला शोधून तिला माझ्यासोबत पाठवा असे म्हणून त्याने पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन आत्महत्या करणार असल्याची धमकी देखील दिली होती.
दरम्यान, मुंढवा पोलिसांनी आरोपी सौदागर आणि त्याच्या पत्नीला रविवारी १९ मे रोजी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी देखील पत्नीने आरोपी सोबत जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सौदागर याने पत्नीला शिवीगाळ केली, आणि पोलीस ठाण्यातून बाहेर निघून गेला. पोलीस ठाण्याच्या आवारात त्याच्या गाडीच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढून अंगावार ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे, सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, पोलीस शिपाई कोकणे महिला पोलीस नाईक जाधव, भोसूरे यांनी धाव घेत आरोपीच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. सौदागर काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.