प्रतीक गोरडे
लोणी-धामणी : शिरदाळे-धामणी (ता. आंबेगाव) येथील घाटात सोमवारी (ता. २९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती वणवा लावण्याच्या प्रयत्नात होत्या. परंतु त्याचवेळी त्या रस्त्यावरून निघालेले शिरदाळे गावचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांच्या चाणाक्ष नजरेने ही बाब अचूक हेरली आणि प्रसंगावधान राखून त्यांनी वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्रीची वेळ, एकटी व्यक्ती आणि वणवा विझवण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. मात्र, हार न मानता सरडे यांनी जवळच वास्तव्याला असणाऱ्या विक्रम बोऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधून पोते ओले करून आणण्यास सांगितले. विक्रम बोऱ्हाडे काहीच क्षणात त्याठिकाणी पोहोचले आणि दोघांनी वणवा विझवला. यामुळे मोठा अनर्थ टळला. सरडे यांच्या प्रसंगावधानाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शिरदाळे-धामणी घाटात बरीच जनावरे रानात खासगी क्षेत्रात चरायला जात असतात. त्यामुळे वणवा भडकला तर मोठे नुकसान झाले असते. शिवाय जवळच वनविभागाचे क्षेत्र आहे. त्याठिकाणची अनेक झाडे जळून खाक झाली असती. अनेक वन्यजीवांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला असता. परंतु प्रसंगावधान राखत या दोन तरुणांनी हे सामाजिक काम पार पाडले.
धामणी वनक्षेत्राच्या वनपाल सोनल भालेराव यांना या संदर्भात माहिती दिली. त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. वणव्यामध्ये गवत तर जळतेच; परंतु तेथे असणारे छोटे-मोठे कीटक, पशु-पक्षी हे देखील आगीत जळून खाक होतात. तसेच झाडांना आग लागली तर पशु-पक्ष्यांची घरटी देखील नष्ट होतात. त्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट होते. यापुढे वणवा लावू नये, त्यामुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान होते, असे आवाहन वनपाल सोनल भालेराव यांनी केले आहे.
समाजात अशी कृत्य करणारे समाजकंटक असतात. परंतु अशी कृत्ये करताना त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. जनावरांना खासगी जागेत चराऊ रान, वनविभागात झाडे, वन्यजीवांची मोठी हानी होत असते. त्यामुळे असे कृत्य करू नका.
– रेश्मा बोऱ्हाडे, सरपंच, धामणी
– मयूर सरडे, माजी उपसरपंच, शिरदाळे