पुणे : पुण्यातील हडपसर मगरपट्टा परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. मित्राबरोबर घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने खोलीत नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटन समोर आली आहे. ही घटना मगरपट्टा येथील लोहिया गार्डनच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेला. यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सदर पीडित मुलगी ही चार वर्षांची आहे. ती वस्तीतील मुलांसमवेत घरासमोर खेळत होती. त्यावेळी साधारण २२ वर्षे वयोगटाचा तरुण त्या ठिकाणी आला. मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत तिला नेले.
त्या ठिकाणी तिला खाली पाडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलीला हाताने गालावर, कानावर मारहाण केली. एवढच नाही तर, ‘रडलीस तर तुला कापून टाकील’ अशी धमकी दिली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून अनिकेत ढगे नावाचा तरुण तेथे पळत आला.
त्याने खोलीचे दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा घाबरलेला आरोपी त्याला धक्का मारून पळून गेला. दरम्यान, अनिकेत याने मुलीची सुटका केली. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.