विश्रांतवाडी : हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी असली, तरी या ना त्या प्रकारे विवाहितेचा छळ सुरूच असतो. घरबांधणीसाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यास सांगून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. एवढ्यावरच न थांबता फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खडकवासला धरणात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. हा प्रकार ४ मे २०२२ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पती, सासरे आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय विवाहितेने मंगळवारी (ता. १९) फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी पती अतुल भानुदास गुंजाळ (वय ३५), सासरे भानुदास अण्णासाहेब गुंजाळ, सासू लक्ष्मी भानुदास गुंजाळ (वय ५६, तिघे रा. विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादी पत्नीला घर बांधणीसाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यास सांगून शारीरिक व मानसिक त्रास दिला. पत्नी पैसे आणत नसल्याच्या रागाने आरोपी पती अतुल गुंजाळ याने यापूर्वी पत्नीला फ्लॅटच्या गॅलरीमधून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपी पत्नीला फिरण्याच्या बहाण्याने खडकवासला धरण परिसरात घेऊन गेला. तेथे धरणात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.