वाघोली (पुणे) : वाघोली (ता. हवेली) परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी बाजारतळ परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद शाद मोहम्मद शाहिद अन्सारी (वय १८, रा. संतोष कुलाळ यांच्या भाड्याच्या खोलीत, काळूबाईनगर, वाघोली, पुणे, मूळ- मोहल्ला सत्यान, तालुका बढापूर, जि. बिजनौर, राज्य, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २५) गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकातील पोलीस नाईक प्रतीक लाहीगुडे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे हे हद्दीत गस्त घालीत असताना ऋषीकेश व्यवहारे व रमेश मेमाने यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, वाघोली येथे घरफोडी, चोरी करणारी एक व्यक्ती बाजारतळ वाघोली येथे उभी आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्याठिकाणी जाऊन संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता, त्याने रविवारी (ता. २४) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास स्टार डायग्नोस्टिक सेंटर, केसनंद फाटा, वाघोली, पुणे येथील रुममधे उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करुन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे यांच्या पथकाने केली आहे.