पिंपरी : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करत असताना एका मद्यपीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जणांच्या टोळक्याने चोरीला गेलेला माल तपासण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखा युनीट -5 च्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने पोलिसांना लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही घटना रविवारी 7 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक अली अब्दुल शेख (वय-32) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नईम शहा (वय-23), नसीम शहा (वय-35), कलीम शहा (वय-25) नसीम मुदही (वय-24), कलीम मुदही (वय-18 सर्व रा. गोडुंब्रे, ता. मावळ मुळ रा. दुबायल तिवारी, ता. इटवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2)(3), 190, 121(1)(2), 132 नुसार गुन्हा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक अली अब्दुल शेख हे गुन्हे शाखेच्या युनिट पाच मध्ये कार्यरत आहेत. अली शेख आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई अनिल निरवणे हे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात चोरीस गेलेल्या मालाची तपासणी करण्यासाठी गेले होते. या भंगार दुकानात तपासणी करत असताना तेथे असलेल्या आरोपींनी फिर्यादी व निरवणे यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून आले.
फिर्यादी अली शेख यांच्या डोक्यात आरोपी नईम शहा याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड मारला. परंतु, शेख यांनी हात मध्ये घातल्याने रॉडचा मार अंगठ्याजवळ बसल्याने ते जखमी झाले. त्यानंतर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीवर मारुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे सहकारी पोलीस शिपाई अनिल निरवणे यांना देखील धक्काबुक्की केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.