दौंड, (पुणे) : जमिनीच्या वादातून टोळक्याने दोघांना शिवीगाळ दमदाटी करून एकावर तलवारीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड शहरात घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी 7 जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. 14) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील सिटी प्राईड बिल्डींग चंदुकाका सराफ दुकानाच्या जवळ शालीमार चौक येथे घडली आहे.

राजु गलाशा काळे, संदिप राजु काळे, सुषामा राजु काळे, कुसुम राजु काळे (सर्व रा. वेताळनगर दौंड, ता. दौंड), भावड्या यात्रापा पवार, सुरज भावड्या पवार, रेश्मा भावड्या पवार (रा. काष्टी, जामदारमळा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 7 जणांची नावे आहेत. तर लखन राहिक्य चव्हाण व धनराज हरिश्चंद्र भोसले, (वय 31, रा. भाजीमंडई दौड ता. दौंड जि. पुणे) अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. यामध्ये धनराज भोसले यांना राजु काळे याने तलवारीने डावे बाजूस काखेपासून पोटापर्यंत गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी धनराज भोसले यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज भोसले व त्यांचे दाजी लखन चव्हाण हे त्यांचे मोटार सायकलवर वरून निघाले होते. यावेळी वरील 7 जणांनी दुचाकी गाडी आडवून जमिनीच्या वादाच्या कारणावरून मोटारसायकलवर दगड फेकून मारला. यामुळे दुचाकी गाडीवरील धनराज भोसले व त्यांचे दाजी गाडीवरून खाली पडले.
दरम्यान, वरील आरोपींनी त्याना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली तसेच यातील राजु काळे याने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीच्या डावे बाजूस काखेपासून पोटापर्यंत वार करून गंभीर दुखापत केली आहे. तसेच मोटारसायकलवर दगड मारून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी धनराज भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांवर भा.न्या.सं. कलम 189 (2), 190, 191(2), 191(3), 118(2), 118(1), 351(2), 352, सह आर्म अॅक्ट कलम 4, 25 कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.







