लोणी काळभोर : पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगार राज पवार व त्याच्या एका साथीदारावर पालघनसह कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गारुडी वस्तीत बुधवारी (ता.१५) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राज रविंद्र पवार (वय-२५, रा. कवडीपाट गुजरवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे) व सौरभ सुनिल गायकवाड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर आकाश भाले (रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे), सदाम अन्सारी (रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे), सागर कारंडे, किरण चव्हाण, ऑगी उर्फ यश जैन (तिघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर यामधील आरोपी आकाश भाले याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज पवार याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज पवार व सौरभ गायकवाड हे दुचाकीवरून त्यांचा मित्र आकाश भाले याला भेटण्यासाठी लोणी काळभोर येथील गारुडीवस्ती येथे आले होते. तेव्हा आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संगनमत करत राज पवारच्या पोटात पालघन मारली. तसेच त्याचा मित्र सौरभ गायकवाड याच्यावर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले,. त्यानंतर ते आपला जीव वाचवण्याचे उद्देशाने तेथून पळून गेले.
दरम्यान, राज पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज पवारला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. राज पवारने अनेक भांडणे केल्यामुळे त्याच्यावर अनेक जन नजर ठेवून आहेत. तसेच तो एकटा कसा सापडेल, याची संधी साधत आहेत. त्यामुळे त्याच्यावर खुनी हल्ले होणे साहजिकच आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ या हल्ल्यातील एक आरोपी आकाश भाले याला बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित चार आरोपी गुन्हा केल्यापासून फरार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.