लोणी काळभोर : रिक्षाने घरी चाललेल्या पत्रकाराला भर रस्त्यात अडवून डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल संपल्यानंतर यु-टर्न करुन काकडे मळ्याकडे जात असलेल्या रस्त्यावर बुधवारी (ता.9) सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
तुकाराम अर्जुन लांडगे (वय-46, रा. काकडे मळा, थेऊर ता. हवेली जि. पुणे) असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. तर तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम लांडगे हे एक पत्रकार असून त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एक रिक्षा आहे. ते या रिक्षातून दररोज काम ते घर असा प्रवास करीत आहेत. लांडगे हे नेहमीप्रमाणे शनिवारी सहा वाजण्याच्या सुमारास घरी चालले होते. घरी जात असताना, थेऊर रेल्वे उड्डाणपूल संपल्यानंतर यु-टर्न करुन काकडे मळ्याकडे जात असताना त्यांची रिक्षा दोन अॅक्टीव्हा चालकांनी अडविली. त्या दोन दुचाकीवरून तीन अनोळखी इसम रिक्षाजवळ आले.
त्यानंतर तिन्ही अनोळखी इसमांनी तुकाराम लांडगे यांना रिक्षामधुन बाहेर ओढले. व आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दोन्ही पायाच्या नडगीवर व पोटरीवर मारुन जखमी केले. तेव्हा त्यातील एक आरोपी फिर्यादीला म्हणाला, विजय जानबा कांबळे याच्या विरुद्ध तक्रारी करुन पाठपुरावा करतोस ते थांबव, नाहीतर तुझे कांही खरे नाही, असे म्हणून फिर्यादीला पुन्हा शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांने व दांडक्याने मारहाण केली.
दरम्यान, फिर्यादी तुकाराम लांडगे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादी यांच्या डोळयावर मिरची पावडरचा स्प्रे मारल्याने फिर्यादीला कमी दिसु लागले. त्यानंतर तेथून आरोपी पसार झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 126(2), 352, 351(2) (3), 3(5), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय जाधव करीत आहेत.