यवत : येथील श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या प्रेरणा ओंकार शिंदे या मानकरी ठरल्या.
महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांचा आवडता खेळ होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) आयोजन करण्यात आला होता. वर्षभर आपल्या परिवारास सांभाळणाऱ्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. आपल्या रंगतदार व ढंगदार मिस्किल, अनेक प्रकारचे सांघिक खेळ, विनोदी संवाद शैलीने वहिनींची मने जिंकण्याचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध निवेदक होम मिनिस्टर फेम शेखर ओहोळ व सहकारी यांनी खेळीमेळीच्या वातारणात होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टने दरवर्षी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या नावाचा ठसा उमटविला व बऱ्याच वर्षांपासूनची आपली परंपरा व आदर्श यवतकरांसमोर कायम ठेवला आहे.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र ट्रस्टच्या वतीने आयोजित “दांडिया महोत्सव” आणि चला हसुन जगुया, खेळ पैठणीचा खेळुया, या सन्मान महिलांचा “होम मिनिस्टर” स्पर्धेत प्रेरणा शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवून यवत येथील पैठणीच्या मानकरी ठरल्या आहे. त्यांना लाईफ स्टाईल साडीचे मालक निलेश रायकर यांच्यावतीने पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी साक्षी बधे यांनी द्वितीय क्रमांकाचे चांदीचे निरंजन तर रंजना जाना यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तसेच कुकर, साडी, नॉन स्टिक तवा असे उत्तेजनार्थ विजेत्यांना 10 तर सर्वोत्कृष्ट आजी व लकी ड्रॉ स्पर्धेतील महिलांना बक्षिस देण्यात आले. यावेळी पाककला स्पर्धेतील प्रथम विजेत्या गौरी वाघले, द्वितीय विजेत्या प्रमिला कांबळे, तृतीय विजेत्या सुजाता पवार, उत्तेजनार्थ विजेत्या कोयल दोरगे यांसह चित्रकला व कलश स्पर्धेतील जवळपास 25 विजेत्यांना बक्षीस वाटप ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके, काश्मिरा मेहता, शितल शेळके, मृणाली अवचट, रेखा शेळके, पूनम जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजेंद्र गुजर, श्रीतेज शेळके, गणेश शिंदे, अजिंक्य महाडिक, मयूर धोत्रे, सोनू सूर्यवंशी , गौरव पटवा , मंगेश मासुळे, ऋषिकेश पटवा, आदित्य मानकर यांच्यासह श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.