–सागर जगदाळे
भिगवण : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकासह दोघांना जबरी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील मल्लिकनाथ महाराज मठाच्या जवळ शनिवारी (ता.7) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी जिंती (ता. करमाळा) येथील 4 तर भिगवण (ता. इंदापूर) येथील 2 जणांना अटक केली आहे.
अमोल गौतम गायकवाड (वय 40), शरद अशोक धेंडे (वय 31), हनुमंत रामभाऊ गायकवाड (वय 47), भिकाजी वाल्मीक धेंडे (वय 48, चौघेही रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापुर), तौफिक रियाज शेख (वय 24) व विक्रम बाळासो माडगे (वय 28 , दोघेहीरा. भिगवण ता. इंदापुर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजु विठ्ठल पवार (वय 32, रा. सोनवडी, ता. दौंड, जि.पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजु पवार हे ट्रकवर चालक म्हणून काम करतात. राजु पवार यांचा भाऊ व्यंकटेश विठ्ठल पवार व ट्रक चालक अनिल लालु राठोड हे मालट्रक घेऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते. तेव्हा आरोपींनी त्यांच्या ताब्यातील चारचाकीगाडीने ट्रक गाडीला मल्लिकनाथ महाराज मठाच्या जवळ कट मारला. तेव्हा फिर्यादीचे भाऊ व्यंकटेश आरोपींना म्हणाला, गाडी निट चालव, आमच्या गाडीला कट का मारतोय?
दरम्यान, गाडी निट चालव म्हणाल्याचा राग मनात धरून आरोपींनी व्यंकटेश पवार व चालक अनिल राठोड या दोघांना शिवीगाळ दमदाटी केली. व गाडी मधुन खाली ओढुन लाथाबुक्याने व लोखंडी टॉमीने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी जाताना व्यंकटेश याच्या खिशा मधील 33 हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतले आहेत.
याप्रकरणी राजु पवार यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, दौंड पोलिसांनी सहाही आरोपींना दोन दिवसाच्या आत बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील करीत आहे.