-बापू मुळीक
सासवड : येथील कुलदैवत श्री. खंडोबा व म्हाळसादेवी मंदिरात बसविलेले घट उठवून शनिवारी (दि.07) चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली. या वेळी उपस्थितांनी भंडारा उधळीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर केला. देवाला पुरण- पोळी, वांगे भरीताचा नैवेद्य व रोडगा अर्पण करून तळीभंडाराचा कुलधर्म, कुलाचार करून उपासनेची सांगता करण्यात आली.
श्री खंडोबा मंदिरात देवांना सकाळी 11 वाजता दही, दूध, पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी महाआरती होऊन घट उठवून खंडोबाची विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी करून देवांना दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी 4 वाजता देवतांना नवीन पोशाख अर्पण करण्यात आला. श्री म्हाळसाकांत खंडोबा चंपाषष्ठी भंडारा उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी 5 वाजता वांगे, भरीताचा व रोडगा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री 7 ते 10 श्री खंडोबा व म्हाळसादेवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. रात्री 10.30 वाजता सिध्देश्वर एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला.
उत्सवानिमित्त सात दिवस मंदिरात विविधरंगी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती पुजारी मोहन भैरवकर, रामचंद्र भैरवकर, गणेश भैरवकर, हर्षल भैरवकर यांनी दिली. या वेळी संदीप (नाना) जगताप, गावचे पाटील संग्राम जगताप, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप,संजय चव्हाण, सागर आबा जगताप, अजित जगताप, दीपक टकले, प्रवीण पवार, वैभव जगताप, यशवंत भांडवलकर, सचिन जगताप, एकनाथ थोरात, भगवान पवार, बाळासाहेब जगताप, सम्राट जगताप, उमेश जगताप आदी उपस्थित होते