चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील पतोडीया फोर्जिंग अँड गिअर्स लिमिटेड या कंपनीच्या एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे इंगळे येथील पतोडीया या कंपनीत (दि. १ एप्रिल २०२१ ते २८ एप्रिल २०२४) या कालावधीत हा प्रकार घडला.
सूर्यकांत दशरथ वाघमारे (वय ५०, रा. चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव राम जाधव (वय- ४०, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी की, पतोडीया कंपनीचा अधिकारी जाधव हा कंपनीत असिस्टंट मॅनेजर अकाउंट म्हणून काम करत आहे. जाधव यांच्याकडे फिर्यादीच्या कंपनीतील माल पुरवणारी व्हेंडर कंपनी व फर्म यांना कामाच्या स्वरूपानुसार देणे असणारी रक्कम अदा करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवली होती. मात्र, आरोपी जाधव याने एप्रिल महिन्यात कंपनीच्या वेगवेगळ्या व्हेंडर कंपनी फर्म यांना रक्कम दिल्याचे दर्शवून ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदेकरता कंपनीचा विश्वासघात करून त्याने त्याच्या हडपसर येथील एका बँक खात्यावर जमा केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.