पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या सहायक आयुक्त सुचिता पानसरे यांची पनवेल महापालिकेत बदली झाली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी मॅटकडे दाद मागितल्याने या बदलीला स्थगिती मिळाली असून त्यांना पुन्हा पिंपरी महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या चार सहायक आयुक्तांच्या नगरविकास विभागाने एकाच दिवशी (दि. २०) राज्यातील अन्य महापालिकांमध्ये बदल्या केल्या होत्या. यामध्ये पालिकेतील प्रशासन अधिकारी सुचिता पानसरे यांची पनवेल महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी बदली झाली होती.
सुचिता पानसरे यांनी बदलीच्या या निर्णयाविरोधात मॅटकडे दाद मागितली होती. त्यानुसार मॅटने पानसरे यांच्या बदलीला अंतरिम स्थगिती दिली. याबाबतचे आदेश प्राप्त होताच पानसरे यांना पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यांची अस्थापनाविषयक बाबी समाजविकास विभागाकडे राहणार असून झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कारभार त्यांना देण्यात आला आहे.