पुणे : कंपनीचे मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (ता.२०) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
साहेब एकनाथराव देसाई (अन्न व औषध प्रशासन विभाग, सहायक आयुक्त (अन्न) वर्ग-१ पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीच्या मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी लोकसेवक आरोपी साहेब देसाई यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक साहेब देसाई यांना तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी लोकसेवक देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास ०२० – २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा. असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.