पुणे : पुण्यातील गुलटेकडी परिसरातून एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असं म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चुलत्यानेच लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच याबाबत घरात सांगितलं तर आई आणि तुला मारुन टाकील अशी धमकी देखील पीडित मुलीला दिली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ६ जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने २३ जानेवारीला स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून चुलता, चुलती आणि तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चुलती मुलीला तिच्या घरी घेऊन गेली. घरात त्या दोघी पत्ते खेळत होत्या. यावेळी चुलत्याने आणि इतर आरोपींनी मुलीच्या अंगाला अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले. यानंतर चुलता अल्पवयीन मुलीला आतील खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असं म्हणत तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं.
आईला सांगितलं तर दोघींना मारून टाकण्याची धमकी
या प्रकाराबाबत आईला काही सांगितलं तर आई आणि तुला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली. यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. अखेर मुलीने मंगळवारी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी ६ जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दसगुडे करत आहेत.