बारामती : बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एका युवकावर कोयता गँगने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश उर्फ पप्पू दिगंबर भापकर (रा. माळेगाव, ता. बारामती ) असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना माळेगावमध्ये ५ डिसेंबर रोजी घडली आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत. चेतन बाळू जाधव, मयूर रणजीत जाधव, विजय बाळासाहेब कुचेकर ( तिघेही रा. माळेगाव, ता. बारामती) आणि दिनेश आडके (रा. शिरवली, ता. बारामती) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन जाधव याच्या वडीलाबरोबर काही दिवसांपूर्वी भापकर याचे भांडण झाले होते. भापकर याने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. याचाच जुना राग मनात धरून चेतन जाधवने इतर तिघांच्या मदतीने भापकर हा काम करत असलेल्या फायनान्सच्या कार्यालयात जाऊन त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला.
दरम्यान, आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिक धावत आले असता चौघेजण घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी तातडीने हालचाल करत चौघांना पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यातील तिघांना फलटण नगरपालिकेच्या कचरा डेपोच्या हद्दीत पाठलाग करून पोलिसांनी पकडले. तर एकाला बारामती नगरपालिकेच्या हद्दीत ताब्यात घेतले.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे सहायक निरीक्षक सचिन लोखंडे, फौजदार अमोल खटावकर, सहाय्यक फौजदार शरद तावरे यांच्या पथकाने केली.