पुणे : पुणेकरांसाठी वाईट बातमी आहे. विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाला. त्यात पुणे विमानतळाचा दर्जा घसरला असल्याचे चित्र आहे. पुणे विमानतळाची क्रमवारी 70 वरून 72 वर आली आहे. ‘एसीआय-एएसक्यू’च्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले.
एसीआय-एएसक्यूकडून 2006 पासूनच दरवर्षी विमानतळाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. 95 देशांमधील 400 विमानतळांचा या सर्वेक्षणात समावेश असतो. यामध्ये भारतातील 15 विमानतळांचा समावेश आहे. त्यात पुणे विमानतळही आहे. ‘बेस्ट एअरपोर्ट बाय साईज’ या वर्गात पुणे विमानतळ असून, या यादीत विमानतळाचे 11 वे स्थान आहे. मात्र, दर्जाच्या बाबतीत ते 72 व्या स्थानी आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार वंदना चव्हान यांनी राज्यसभेत पुणे विमानतळावरील मूलभूत सुविधांचा अभाव आणि तत्सम मुद्द्यांबाबत सार्वजनिक हवाई वाहतूक राज्यमंत्री वीके सिंह यांना प्रश्न विचारला, तेव्हा पुणे विमानतळाला खालचा दर्जा मिळाल्याची बाबही प्रकाशझोतात आली.
‘प्रत्येक विमानतळावर सुरक्षा आणि प्रवाशांना महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या जाणे महत्त्वाचे असते. पण, पुणे विमानतळावर मात्र तसे चित्र पाहायला मिळत नाही. या विमानतळाची क्रमवारी घसरतच चालली आहे. अशा परिस्थितीत पुण्यासारख्या विमानतळांसाठी कोणती पावले उचलली जात आहेत?’, असा सवाल चव्हाण यांनी सार्वजनिक हवाई वाहतूक राज्यमंत्री वीके सिंह यांना राज्यसभेत विचारला.
कोणत्या आधारावर सर्वेक्षणात ?
‘एसीआय-एएसक्यू’च्या वतीने हे सर्वेक्षण विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा आणि सुविधांच्या आधारे करण्यात येते. जिथे प्रवाशांचीही मते विमानतळावरील स्वच्छतागृहाची स्थिती, चेक इन आणि सिक्युरिटी काऊंटवर प्रवाशांना लागणारा वेळ, टर्मिनलवरील स्वच्छता, टर्मिनलमधील खाद्यपदार्थांचे स्टॉल, कर्मचारी आणि प्रवाशांमधील संवाद या आणि अशा साधारण 28 निकषांवर विचारात घेतली जातात.