अमिन मुलाणी
सविंदणे(पुणे): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतच्या सरपंच पदी आसिया तांबोळी विजयी झाल्या असून अटीतटीच्या लढतीत अकरा सदस्यांपैकी त्यांना सहा मते मिळाल्याने त्यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाला सरपंच पदाचा मान मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
ग्रामपंचायतच्या सरपंच राजश्री काळुराम रूपनेर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत संगीता मोहन पुंडे, चंद्रभागा विठ्ठल खर्डे, आसिया अल्ताफ तांबोळी असे सरंपच पदासाठी तीन अर्ज आले होते. यामध्ये चंद्रभागा विठ्ठल खर्डे यांनी माघार घेतल्याने पुंडे व तांबोळी यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत पुंडे यांना पाच तर तांबोळी यांना सहा मते मिळाल्याने सरपंच पदासाठी आसिया तांबोळी यांना विजयी घोषीत करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी प्रशात शेटे व सहाय्यक निवडणुक अधिकारी के. बी. घासले यांनी काम पाहिले. निकाल जाहिर झाल्यानंतर श्री मेसाई देवी मंदिरा पर्यंत शांततेत मिरवणुक पार पडली.
माजी सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात ( पुणे ग्रामीण ) चे कार्याध्यक्ष युनूस तांबोळी, पॅनेल प्रमुख दादा खर्डे, निवृत्त पोलिस अधिकारी बाबाजान तांबोळी यांनी सरपंच आसिया तांबोळी यांचे अभिनंदन केले.
कान्हूर मेसाई गावच्या विकासासाठी अधिकाअधिक प्रयत्न करणार. जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरंपच आसिया तांबोळी यांनी सांगितले.