Ashtavinayak Darshan पुणे : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबरोबरच अष्टविनायकाचे प्रमुख स्थान आहे. या प्रवासादरम्यान येणारे व्यत्यय, मार्गांवरील अडथळे पाहता हा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अष्टविनायकांच्या स्थळांना जोडणार्या २५२ कि. मी. रस्त्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पावरील रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात असून, लवकरच अष्टविनायक दर्शन अवघ्या २४ तासांत करता येणार आहे. या प्रकल्पावरील रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.
९०० कोटी रुपये खर्च…!
पीडब्ल्यूडीअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्गाशी जोडण्याच्या प्रस्तावास सप्टेंबर २०१८ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ९०० कोटी रुपये खर्च येणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे खासगी कंपनीद्वारे काम करण्यात येत असून, मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण आदी कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.
त्यापैकी मोरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर) गिरिजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर) आणि महागणपती (रांजणगाव) हे पाच गणपतींचे मंदिर पुणे जिल्ह्यात असून, सिद्धेश्वर (सिद्धटेक) नगर जिल्ह्यात, तर बल्लाळेश्वर (पाली) आणि वरदविनायक (महाड) ही दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत.
दरम्यान, हा संपूर्ण मार्ग ६५४ कि. मी.चा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत येणारे महामार्ग सुधारणा सुरू असताना पीडब्ल्यूडीने या मार्गावरील २५२ कि. मी. रस्त्यांचे जाळे जोडण्यास सुरुवात केली आहे.