पुणे: श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘गुरूमहात्म्य पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी (दि.१०) झाला. याप्रसंगी अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्यामिशनचे प्रल्हाद वामनराव पै, क्विक हिलचे चेअरमन डॉ. कैलास काटकर यांना हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अशोक सराफ म्हणाले, आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही तरी शिकत असतो. त्यामुळे ते आपले गुरू असतात. मात्र, मी एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो. असे जे गुरू आहेत, ते म्हणजे रसिक मायबाप. मी कुठलीही कला सादर करत असताना तुमच्यासमोर लोटांगण घालतो. तुम्हाला आमची कला आवडली नाही, तर आम्ही कसले गुरू. खरे गुरू तुम्ही रसिकच आहात, अशा भावना अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
पुढे अशोक सराफ म्हणाले, आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत. त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी आहे. या सर्वांसमोर माझे फार मोठे कौतूक तुम्ही केलं आहे. हा पुरस्कार कधीच विसरू शकणार नाही. मी काही थोर नाही. पण तुम्हाला मी तसा वाटलो, हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे. आपण थोर असल्याचे दाखवून देणे हे सुखकारक असते. हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही, याला बऱ्याच लोकांची साथ असते, असं अशोक सराफ म्हणाले.
मला राजदत्त साहेब यांच्या हस्ते पुरस्कार दिला, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्याकडून मी खूप शिकलो. राजदत्त यांनी माझ्याकडून खूप भूमिका काढून घेतल्या. त्यांच्या सिनेमात मी नायक आणि खलनायक अशा व्यक्तीरेखा केल्या आहेत. दोन्ही खूप प्रसिध्द झाल्या. आज सर्वप्रकारचे सिनेमे त्यांनी सादर केले आहेत. त्यांच्याकडून मी खूप शिकलो, अशा भावना अशोक सराफ यांनी यावेळी व्यक्त केल्या.