पुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं. यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर देखील अजित पवार गट दावा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच, दुसरीकडे शरद पवार गट अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे. हडपसर मतदारसंघात शरद पवार गटाचा मेळावा होत असून, या मेळाव्यात त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा आगामी प्लॅन सांगितला आहे. एवढेच नव्हे तर आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कोण असेल, हे देखील अप्रत्यक्षरित्या जाहीर केले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. येत्या काळात पक्षाची कामगिरी कशी असेल किंवा पुण्यातील चित्र कसं असेल?, पक्षातील कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतील आणि अर्थात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, यासंदर्भातील सगळा प्लॅन पाटील यांनी सांगितला आहे. कार्यकर्त्यांना सूचना देताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांत जे काही घडलं ते आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता नव्याने लढायला सुरूवात करत आहोत. सगळ्यांना बुथ कमिट्यांवर काम करायचे आहे. पक्षाचे काहीही झाले असले तरी अनेक लोक आपल्यासोबत आहेत. त्यामुळे योग्य पद्धतीने काम केले तर चांगलाच निकाल मिळेल.
आगामी निवडणुकीसाठी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केला आहे. प्रशांत जगताप हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकतात. प्रशांत जगताप यांच्या नावाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. गेल्या निवडणुकीत चेतन तुपे अवघ्या २,७०० मतांनी निवडून आले तरीही ते अजित पवारांसोबत गेले. आता त्यांना भाजप कसे आहे ते कळेल, अशीटी टीका त्यांनी तुपे यांच्यावर केली.