-सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण गावासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी तब्बल 9 कोटी रुपये मंजुर झाले असल्याची माहिती सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी दिली. या प्रकल्पामुळे सांडपाण्याची समस्या लवकरच सुटणार असून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाणार आहे.
नमामि चंद्रभागा अभियानाअंतर्गत नदी संवर्धन व संरक्षण करण्याकरीता हा प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी बंद करून या प्रकल्पाद्वारे एकत्रित केले जाणार असून त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. नदीकाठच्या गावातुन गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी आणि घाण पाण्यात मिसळल्याने चंद्रभागा अर्थात भीमा नदी प्रदूषित झाली आहे. पाण्यात झालेले प्रदूषण रोखण्यासाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे भविष्यकाळाची गरज असल्याने हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करण्यात येणार असून यातून सांडपाणी समस्या सुटणार असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
प्रकल्प संचालक, जि.प. पुणे यांच्याद्वारे या कामाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. व काम पुर्ण करण्याचा कालावधी पंधरा महिने असणार आहे.
भिगवण गावाच्या दृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने सदरचे काम मंजूर झाले आहे.या प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होऊन घाण पाण्याची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांना दिली जाईल. तसेच या संदर्भातील कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून दिली जातील.
-दिपीका क्षीरसागर,सरपंच भिगवण