पुणे : ग्रॅनाइट संगमरवरीच्या नावाखाली दुर्मीळ रक्तचंदनाच्या लाकडाच्या (रेड सैर्डस) तस्करीचा कट महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पुणे विभागाने उधळून लावला आहे. पुणे महसूल गुप्तचर विभागाने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या बंदरात (न्हावा शेवा) बुधवारी रक्तचंदनाच्या लाकडांनी भरलेला कंटेनरवर कारवाई केली आहे.
या कारवाईत आठ टन रक्तचंदन जप्त केले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची आंतराष्ट्रीय बाजारात ७ कोटी ९० लाख रुपये एवढी किंमत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, परदेशात मोठ्या प्रमाणावर रक्तचंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनायाच्या पथकाला मिळाली होती. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून परदेशात जहाजातून रक्तचंदन पाठविण्यात येणार होते. रक्तचंदन घेऊन बंदरात निघालेला कंटनेर पथकाने अडवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी कंटेनरमध्ये सहा टन रक्तचंदन आढळून आले.
रक्तचंदन लाकूड हे संरक्षित प्रजाती असून, सीमाशुल्क कायदा, १९६२ अंर्तगत त्यांची निर्यात प्रतिबंधित करण्यात आली आहे. जेएनपीटीमध्ये तब्बल सहा टन रक्तचंदन आढळून आले. त्यानंतर सदर माहितीच्या आधारे अहमदनगर, नाशिक आणि हैदराबाद येथील काही ठिकाणी छापा टाकण्यात आला.
नाशिक येथील एका गोदामाची झडती घेतली असता दोन मेट्रिक टन रक्तचंदन आढळून आले. ते लवकरच परदेशात निर्यात केले जाणार होते. उरण न्हावा- शेवा बंदरात जप्त करण्यात आलेले सहा मेट्रिक टन रक्तचंदन हेदेखील याच गोदमात साठवून निर्यातीसाठी बाहेर काढण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालायीन कोठ़डीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.