पुणे : पुण्यातील सिंहगड परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात एक सुंदर असे गाव कुडजे आहे. या गावत तब्बल १२ फूट लांबीचे अजगर आढळून आले आहे. ५ सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षित जंगलात सोडले आहे.
कुडजे गावाच्या परिसरातील जैवविविधता चांगली असल्याचे यावरून स्पष्ट होते.
सर्पमित्र स्वप्निल काकडे, आकाश झोंबाडे, पृथ्वीराज काळे, साहिल केंद्रे, विष्णू कोंडरवाड यांनी अजगराला जंगलात सोडले. तर यासाठी वन्यजीव संरक्षक तानाजी भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
अजगर हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो.
भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो.
यामुळे अशा प्रकारे मिळताना भक्ष्याची शिंगे, पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पाप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य मिळता येते.
अजगर हा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे. भारतातील अजगराला रॉक पायथॉन म्हटले जाते. घनदाट जंगल, झाडांवर, खडकाळ जमिनीवर याचा वावर आहे.
भारतात सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मीटरपर्यंत तर घेर २५ सेंटीमीटर आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात.
पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात.
दरम्यान, अजगर हा भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात.
एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.