पुणे : जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे पुण्यातील मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. पुण्यात तब्बल एक लाख ७५ हजार मतदारांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० हून अधिक आहे. तर १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदारयादी आज जाहीर झाली. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली.
दरम्यान, मागील वर्षी १ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० एवढी होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० लाख ७३ हजार १८३ होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणीची सुविधा, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदारयादीत मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ एवढी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत ७८ हजार ४९, तृतीयपंथी मतदार २००, परदेशातील मतदार ५७, सैन्य दलातील मतदारांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग मतदार संख्या ९ हजार २६७आणि ८० वर्षांवरील मतदार संख्येत ३४ हजार १४१ एवढी घट झाली आहे.
१८ ते १९ वयोगटातील मतदार नोंदणीस मोठ्या प्रमाणात वाव असल्याने १०५ महाविद्यालयात निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसरातच ऑनलाईन मतदार नोंदणी करून घेण्यात आली. वर्शीप अर्थ फाऊंडेशनच्या मदतीने कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत मतदार नोंदणीचे महत्व आणि प्रक्रीया पोहोचविण्यात आली. निवडणूक साक्षरता मंडळाच्या अंतर्गत १०६ महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे एकाच दिवशी आयोजन करण्यात येऊन शिबीरामधून सुमारे १८ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक कार्यालय व वुई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एकूण ८७ महाविद्यालयांमधून १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १४ हजार ८१६ अर्ज भरून घेण्यात आले.
नवमतदार अर्थात २०-२९ वयोगटातील नोंदणीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला. रेडीओ जॉकी संग्राम खोपडे यांची मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील व्हिडीओ संदेशाद्वारे मतदारांना नोंदणीसाठी आवाहन केले. पदव्युत्तर महाविद्यालयातही नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याने प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत या वयेागटातील मतदारांच्या संख्येत ६५ हजार ९८४ एवढी वाढ झाली. तर महिला मतदार नोंदणीसाठी गावोगावी असलेल्या बचत गटांमार्फत महिलामध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यासोबत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. २७ ऑक्टोबर २०२३ अखेर लिंग गुणोत्तर ९१० झाले होते व अंतिम मतदारयादीत हे लिंग गुणोत्तर ९१५ आहे.
घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांबाबत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करणेत आली. ज्या मृत मतदारांचे मयताबाबतचे पुरावे प्राप्त होऊ शकत नव्हते त्यांच्या बाबतीत जन्म मृत्यु नोंदणी विभागाकडून मागील ५ वर्षांतील माहिती उपलब्ध करुन घेऊन मयत मतदार वगळणीचे काम करण्यात आले. जागेवर न आढळणाऱ्या आणि स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करुन वगळणी करण्यात आली. या मोहिमेत ९१ हजार ६७० इतके मृत ३७ हजार ४२० इतके स्थलांतरीत मतदार आढळून आले.
मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने समान छायाचित्रे असलेली व दुबार नावे असलेली ५० हजारांवर नावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी यांनी दैनदिन आढाव्यात त्रुटी व अडचणींचे निराकारण करुन आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून समान छायाचित्रे असलेली ४० हजार ३९० आणि १० हजार २०४ दुबार नावे वगळली आहेत.
मतदार नोंदणी प्रक्रीया 23 जानेवारीनंतरही सुरू राहणार आहे. पात्र मतदारांनी यादीत आपले नाव नसल्यास नमुना क्र.6 चा अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या मतदान केंद्रावर भरावा. मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींद्वारे मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.