पुणे : पुणे महापालिका, कमिन्स इंडिया फाउंडेशन, केपीआयटी आणि पर्यावरण क्षेत्रातील स्थानिक सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे ‘पेहेल-२०२४’ या ई-कचरा व प्लास्टिक संकलन महाअभियानाचे शहरस्तरावर आयोजन केले होते. या अभियानामध्ये संपूर्ण शहरामध्ये ४१५ हून अधिक संकलन केंद्राच्या माध्यमातून ५३ टन कचरा संकलित झाला. त्यामध्ये ४० टन ई-कचरा आणि १३ टन प्लास्टिक कचरा जमा झाला आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त दरवर्षी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येतात. वर्गीकरण पुणे जनजागृती, कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट नष्ट करणे व पेहेल २०२४ उपक्रम यांचा समावेश आहे. या अभियानाचे उद्घाटन संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे झाले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त संदीप कदम, कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख सौजन्या वेगुरू, केपीआयटीचे सीएसआर प्रमुख तुषार जुवेकर, सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला, क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मल्हार करवंदे, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे संचालक अतुल क्षीरसागर व सीईओ डॉ. राजेश मणेरीकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे आदी उपस्थित होते.
या अभियानात स्वयंसेवकांकडून उभारण्यात आलेल्या ४१५ संकलन केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने ई-कचरा आणि प्लास्टिक जमा केले. या अभियानातून एकूण ७ हजार ५०० जणांनी आपल्या घरातील कचरा केंद्रावर दिला. यावेळी अंदाजे ५३ टन कचरा संकलित झाला असून, त्यामध्ये ४० टन ई-कचरा आणि १३ टन प्लास्टिक कचरा जमा झाला आहे.
जमा झालेल्या ई-कचऱ्यातून दुरुस्त होण्यासारखे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करून गरजू शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. उर्वरित ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये जनजागृतीचे प्रयोग
वेगवेगळ्या संस्थांच्या, कंपनीच्या तसेच महाविद्यालयाच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांनी १८ ते २४ फेब्रुवारी यादरम्यान नागरिकांमध्ये अभियानांतर्गत जनजागृतीचे प्रयोग केले. यामध्ये पथनाट्य, खेळातून जनजागृती, चौकसभा, पत्रक वाटप केले गेले. या अभियानात स्वयंसेवकांकडून उभारण्यात आलेल्या 415 संकलन केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने ई-कचरा आणि प्लास्टिक जमा केले.