पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात शंभरी पार केलेले मतदार ५ हजार २३१ आहेत. त्यात पुरुष मतदार २ हजार 546, तर महिला मतदार २ हजार ६८४ असून, एक तृतीयपंथी मतदार आहे. शंभरी पार केलेल्या मतदारांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार १३८ जास्त आहेत. जुन्नर, आंबेगाव, आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांत १०० पार केलेल्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. यात सर्वाधिक कोथरूड विधानसभा मतदारसंघात ५६५, तर सर्वात कमी मावळ मतदारसंघात ८१ मतदार आहेत.
यातील १ हजार ९२५ मतदार घरबसल्या मतदानासाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित मतदार हे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत. अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प तयार केले आहे. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतनीस उपलब्ध असणार आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत शंभरी पार केलेले तब्बल पाच हजार २३१ मतदार असून, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या शतायुषी मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठ मतदारांना विनाअडथळा मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.