लोणी काळभोर: पुण्यात लोणी काळभोर परिसरात एकाच घरात तब्बल 135 गॅस सिलेंडर साठवून सिलेंडरचा काळाबाजार करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो लहान मोठ्या कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली होती. परिसरात एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस पाईपच्या सहाय्याने काढून लहान मोठ्या कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरत होता. पोलिसांनी कारवाई करत चोरट्याकडून इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप, वेगवेगळ्या कंपनीचे लहान मोठे व कमर्शियल असे 135 गॅस सिलेंडर,नोजल असा 2 लाख 13 हजार 950 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मदन माधव बामणे (वय २०, रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर) असे या चोरट्याचे नाव आहे.

चोरट्याला रंगेहात पकडल्यानंतर पोलीस ठाण्यातील पथकाने मदन बामणे याच्या घरावर छापा टाकला तेव्हा आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकरित्या भरत असल्याचे आढळून आले. दरम्यान, मदन माधव बामणे विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







