पुणे : कोयता गॅंगवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही कोयता गॅंगची दहशत कमी झालेली नाही. वारजे भागात दहशत माजवून, कोयते उगारून, टोळक्याने तब्बल १२ वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसह साथीदारांना अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, याबाबत अभिजीत विभिषण धावने (वय ३०, रा. त्रिमूर्ती सोसायटी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर यांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावने हे वाहतूकदार असून, सोमवारी त्यांचे वडील गावावरून येणार असल्याने, त्यांना घेण्यासाठी ते शिवाजीनगरकडे निघाले होते. सोमवारी मध्यरात्री आरोपी अविनाश, सतीश, विशाल आणि साथीदार वारजे माळवाडीतील यशोदीप चौकात आले. त्यावेळी आरोपींनी वाद घालून, शिवीगाळ सुरू केली. त्यांच्या हातात कोयता, बांबू अशी हत्यारे होती.
दरम्यान, आरोपींनी रस्त्यात लावलेल्या मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केली. त्याच वेळी धावने तेथून निघाले होते. आरोपींनी धावने यांना अडवून धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या खिशातील चार हजार रुपयांची रोकड काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला व जीवे मारण्याची धमकी दिली. संतप्त टोळक्याने परिसरातील घरांवर देखील दगडफेक केली. अचानकपणे घडलेल्या या प्रकाराचा धावने यांनी धसका घेतला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल ओलेकर करत आहेत.