पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुमारे १३६.८० किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम मिळावे म्हणून देशासह परदेशातील कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. यामध्ये १२ कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या आहेत. या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली असून, ती पूर्ण होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. अशी
माहिती समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, हवेली, खेड, मावळ तालुक्यामधून हा रिंग रोड जाणार असून नऊ वेगवेगळ्या भागामध्ये साकारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्ते विकास महामंडळाने निविदा जाहीर केल्या आहेत. यासाठी २८ कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे १९ कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्याच कंपन्यांनी नऊ पॅकेजससाठी निविदा सादर केल्या आहेत.
पुणे रिंग रोडसाठी १२ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. यामध्ये मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि., अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन, एच. जी. इन्फ्रा इंजिनीअरिंग, एल अँड टी, नवयुगा इंजिनीअरिंग कंपनीसारख्या देशासह परदेशातील बड्या कंपन्यांचा समावेश आहे. तर मेघा, नवयुगा; तसेच अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वाधिक कामांसाठी निविदा दाखल केल्या आहेत.
रिंग रोडसाठी निविदा सादर केलेल्या कंपन्यांच्या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया सर्वात प्रथम पूर्ण होईल. पुढे कंपन्यांच्या निविदांची आर्थिक छाननी केली जाईल. त्यानंतर अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर पात्र कंपन्यांना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येतील.
दरम्यान, रिंग रोड पूर्व आणि पश्चिम टप्प्यात होणार असून, त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के जमीन संपादित झाली आहे. प्रकल्पासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.