पुणे : येवलेवस्ती (पेरणे) ते बकोरी तसेच लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. असं असतानाही आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा या रस्त्याचे भूमिपूजन केले. तसेच भूमिपूजन केलेल्या बोर्डावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे हवेली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत उद्घाटन केलेले बोर्ड उखाडला आहे.
नेमकं प्रकरण काय?
येवलेवस्ती ते बकोरी तसेच लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन १६ सप्टेंबर २०२३ रोजी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, भाजपा विधानसभा प्रमुख प्रदीपदादा कंद, संदीप भोंडवे, विपुल शितोळे, पेरणे गावचे सरपंच शामराव गावडे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. हा निधी तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, या रस्त्यांचे भूमिपूजन होऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. असं असताना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा चुकीच्या पध्दतीने या रस्त्याचे भूमिपूजन केले. वास्तविक पाहता हा रस्ता तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आला असताना आमदार अशोक पवार यांनी उद्घाटन केलेल्या पाटीवर जाणीवपूर्वक चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव टाकले नाही.
त्यामुळे हवेली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत आज उद्घाटन केलेले बोर्ड सन्मानपूर्वक बाजुला काढुन ठेवले, वास्तविक बोर्डाला काळे फासणे, बोर्डाचा विध्वंस करणे, हा उद्देश ठेवून भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोचले होते. मात्र बोर्डावर पालकमंत्री अजित पवार यांचे नाव असल्याने तो बोर्ड सन्मानपूर्वक बाजूला काढून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वेळी भाजपा क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, पुणे जिल्हा महीला मोर्चा अध्यक्ष पुनमताई चौधरी, पुणे जिल्हा भाजपा सचिव प्रदिप सातव, भाजपा हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे, शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोळे, भाजपा हवेला तालुका सरचिटणीस गणेश चौधरी, दीनेश झांबरे तसेच भाजपा व शिवसेना तालुका संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.