केडगाव (पुणे): उन्हाळी सुट्टीमधील फावल्या वेळात करायचं काय? हा विद्यार्थी आणि पालकांच्या पुढे प्रश्न पडलेला असतो. मात्र, दौंड तालुक्यातील केडगाव येथील आर्यन विजय राऊत या विद्यार्थ्याने सुट्टी मधील आपला वेळ सत्कारणी लावत पर्यावरण पूरक असा प्रयोग केला आहे. सुट्टीमध्ये सायकल घेऊन मित्रांबरोबर भटकणं हा लहान मुलांचा आवडता छंद. याच छंदातून केडगाव येथील रांचो गुरुकुल स्कुलचा सातवीतील विद्यार्थी आर्यन राऊत याने इलेक्ट्रिक सायकल बनवण्याचा प्रयोग केला आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षांच आर्यनने ही किमया केली.
केडगाव येथे शिकणाऱ्या आर्यन ने नुकतीची सातवीची परीक्षा दिली आहे. या धावत्या युगातही इंटरनेटचा पुरेपुर वापर चांगल्या कामासाठी करता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण आर्यनने दिले आहे. आजोबांच्या मदतीनं त्याने ही कृती प्रत्यक्षात उतरवलेली दिसून येते.
इलेक्ट्रिक सायकल बनविण्यासाठी आर्यनने आपल्या सायकलला शिल्लक असलेल्या युपीसमधील दोन बॅटरी आणि मोटर बसविली आहे. एकदा ही सायकल चार्ज केल्यावर ती 20 ते 25 किलोमीटरचे अंतर कापू शकते. साध्या सायकल पेक्षा जास्त म्हणजेच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने अंतर कापते. तसेच या सायकलला आर्यन ने हॉर्न, लाईट आणि कंट्रोलर ही बसवले आहे.
वेळ वाचविण्यासाठी जसा दुचाकी आणि चार चाकीचा वापर अनिवार्य आहे तसेच जर पर्यावरण वाचवायचे असेल तर सायकल वापरणही काळाची गरज बनली आहे आणि आर्यनने बनवलेली ही इलेक्ट्रिक सायकल या दोन्हीमध्ये साधलेला एक सुवर्णमध्यच म्हणता येईल.
आर्यन ने केलेला प्रयोग खूप कौतुकास्पद आहे. आम्ही आमच्या रांचो गुरुकुल शाळेत मुलांना पहिली पासूनच असे नवनवीन प्रशिक्षण देत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांना आताच कोडिंग येत असून पाचवी ते सातवी तील विद्यार्थी रोबोट तयार करत आहेत. त्यामुळे भविष्यात आमचे विद्यार्थी देशात चमकतील असा आमचा विश्वास आहे.
– मोहिनी गायकवाड, प्राचार्य- रांचो गुरुकुल स्कूल, केडगाव