आंबेगाव (पुणे): आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता दोन गट पडल्यावर शरद पवार गटाने प्रचाराला सुरूवात केली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची सभा झाली. या सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकले जाणार असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांची आस्था ही पक्ष फोडणं आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलं राज्य चालवतात, पंतप्रधान मोदींना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. केजरीवाल यांना 16 नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललंय? असा सवाल करत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.