पिंपरी-चिंचवड : २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. अयोध्येतील ‘अमृत महोत्सवा’च्या या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवडमधील कला शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम मंदिरासाठी योगदान देणाऱ्या स्वामी रामभद्राचार्य यांच्या संस्थेकडून अयोध्येत हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी देशभरातील २० चित्रकारांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये दिलीप माळी यांना संधी मिळाली आहे.
थेरगाव येथील प्रेरणा शाळेत दिलीप माळी हे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेली वीस वर्षे चित्रकारिता करत आहेत. माळी हे मूळचे कऱ्हाड तालुक्यातील ओंड या गावचे. अयोध्येत त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाल्याने ते भारावून गेले. त्यांनी हे श्रेय त्यांची आई आणि पत्नीला दिले. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. माळी हे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. वाची आर्ट गॅलरी, मुंबई यांच्या चित्रकार निवड चाचणीतून कलाशिक्षक दिलीप माळी यांची निवड झाली आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते मंदिर परिसरात लाईव्ह पेंटिंग साकारणार आहेत.
देशातील २० चित्रकार श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणार असून, ते त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून हा सोहळा कागदावर जिवंत करणार आहेत. हे काम आव्हानात्मक असून, त्याची उत्सुकता असल्याचे दिलीप माळी यांनी सांगितले.
बेळगाव येथे ए.टी. डी. आणि पुढे अभिनव महाविद्यालयातून जी. डी .आर्ट, ए. एम. पूर्ण केले आहे. आजपर्यंत वैश्विक आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, वाची आर्ट गॅलरी, बालगंधर्व कलादालन, नेहरू सेंटर, मुंबई, ललित कला अकॅडमी दिल्ली येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.