पुणे : दारु पित असताना झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात सिलेंडर मारुन खून केल्याची घटना आळंदी येथील काळे कॉलनीच्या परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला दिघी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने अटक केली आहे. गणेश दिगंबर खंडारे (वय २५, रा. काळे कॉलनी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, आळंदी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे व गणेश खंडारे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गणेश खंडारे हा संतोष खंदारे याच्या हाताखाली मजुरीचे काम करीत आहे. हे दोघेजण १४ डिसेंबर रोजी सायंकाळी दारु पित बसले होते. त्यावेळी जेवण व्यवस्थित बनविले नाही यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आरोपी गणेश याने संतोष यांच्या डोक्यात घरातील सिलेंडर मारला. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन संतोष यांचा मृत्यू झाला. तर आरोपी गणेश हा फरार झाला होता. तर सदर खुनाचा प्रकार हा १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा दिघी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पथक समांतर दिशेने करीत होते. तेव्हा गुन्हे शाखेच्या युनिटचे पोलीस हवालदार राजू जाधव यांनी उपलब्ध मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरु केला. तेव्हा आरोपी गणेश खंडारे याने खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बापू ढेरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे, हवालदार नागरगोजे, राख, पोलीस अंमलदार डोळस, साळवे, मुंडे, जाधव, वाघमारे, कसबे तसेच पोलीस उपनिरीक्षक गिरी, संदीप सोनवणे, समीर काळे, योगेश्वर काळेकर, त्रिनयन बाळसराफ, मनोज साबळे, शशिकांत नागरे, राजकुमार हणमंते, विठ्ठल सानप, यदु आढारी यांच्या पथकाने केली आहे.