पुणे : हॉटेलची तब्बल पावणेचार कोटींची कर थकबाकीप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता राणे यांना दिलासा मिळाला आहे. निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महापालिकेकडे जमा केल्यानंतर त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
निलेश राणे यांची डेक्कन परिसरात व्यावसायिक जागा आहे. या जागेसाठी पुणे महापालिकेने ३ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे जाहीर केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत त्यांची मालमत्ता सील केली होती. निलेश राणेंकडून थकबाकीची वसुली करण्यात यावी अशी मागणी लावून धरत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राणेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान, निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महापालिकेकडे जमा केल्यानंतर त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. ३ कोटी ७७ लाख थकबाकी असताना २५ लाखांचा धनादेश दिल्यावर थकबाकी शून्य कशी होते, हे कोडे अद्याप कोणालाही उकललेले नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेने यासंदर्भात सांगितलं की, उर्वरीत मालमत्तेप्रकरणी वाद सुरु आहे. त्यामुळे सध्या मिळकत कर शून्य करण्यात आला आहे.
डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पुणे महानगरपालिकेने मंगळवारी राणेंच्या हॉटेलला सील ठोकली होती. शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.