लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विलू पुनावाला ट्रस्टकडून शुद्ध पाण्याचा आरो भेट देण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील तब्बल २०० विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटल्याची माहिती थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा आरोग्यदूत पै. युवराज काकडे यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील ‘वायसीएम’ इंग्लिश मीडियम स्कूलला आदर पुनावाला यांच्या मातोश्री स्व. विलू सायरस पुनावाला फाऊंडेशनकडून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरो मशीन देण्यात आले. याचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१९) करण्यात आला.
यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीचे क्षेत्र-व्यवस्थापक निलेश रामेकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, चिंतामणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, शाळेचे मुख्याध्यापक राहुल घुले, आबासाहेब कांबळे, रामदास चव्हाण, रामदास वाघमारे, सोनिया आढावतकर, कुमोदिनी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले, “गेली अनेक दिवसांपासून विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल घुले यांनी वेळोवेळी थेऊर ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन विद्यालयास आरो मशीन उपलब्ध झाले आहे. यावेळी आदर पूनावाला टीमसह गावातील सर्वांचेच यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.”
दरम्यान, या आरो मशिनच्या माध्यमातून विद्यालयास, दररोज ५०० लिटर शुद्ध फिल्टर केलेले पाणी मिळणार आहे. बटण दाबल्यानंतर विद्यार्थ्यांना १०० मि.ली.पासून १ लिटरपर्यंत पाणी मिळणार आहे. हडपसर येथील सीरम कंपनीमधून फिल्टर केलेले पाणी, विद्यालयात दररोज येऊन भरले जाणार आहे.
आपोआप मिळणार पाण्याची माहिती
आरो मशीनच्या पाण्याची पातळी ८०% पर्यंत गेल्यास, ऑटोमॅटिक सेन्सरच्या माध्यमातून, सीरम कंपनीस याची माहिती मिळेल, माहिती मिळाल्यानंतर काही वेळात, कंपनीच्या टँकरमधून आरो मशीनला पाणी पुरवठा होणार आहे.