दौड : चेन्नई – मुंबई या सुपरफास्ट गाडीला दौंड रेल्वे स्थानकात थांबा नसतानाही गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न करणारा लष्करी जवान रुळामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भाऊसाहेब शहाणू देवकर (वय ४८, रा. शहापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असं मृत्यू झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब शहाणू देवकर हे पंधरा दिवसांच्या सुट्टी करता या रेल्वेतून गावाकडे येत होते. या चेन्नई- मुंबई मेल रेल्वेगाडीला दौड रेल्वे स्थानकावर थांबा नाही, ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून जात असताना गाडीचा वेग कमी झाला. या जवानाला अहिल्यानगर येथे जायचे असल्याने त्यांनी चालती गाडी सोडण्याचा प्रयत्न केला, जशी त्यांनी गाडी सोडली तसा त्यांचा तोल जाऊन ते रेल्वे रुळामध्ये पडले. यावेळी त्यांच्या अंगावरून रेल्वेगाडी गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. भाऊसाहेब देवकर हे लष्करात अंदमान निकोबार येथे नाईक या पदावर काम करत होते.