पुणे : पुण्याच्या भवानी पेठेत एक खळबळजनक घटना घडली आहे. जेवण वाढताना वाद झाल्याने पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ससाणे रविवारी (ता. २५) कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. मात्र, रमेश यांनी पैसे देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे त्यांच्यात वाद झाला. संतप्त झालेल्या जयाने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी तिला चापट मारली. माझ्यावर का हात उगारला, म्हणत दोघांमध्ये वाद झाला. जयाने रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले.
या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार भोसले करत आहेत.