पुणे : कुस्ती आणि सुमो कुस्ती खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मनाली जाधव आणि सोनाली तोडकर यांचा भारतीय डाक विभागाच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये आणि डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस, सिमरन कौर यांच्याहस्ते देण्यात आला.
खेळांडूंच्या वृत्तीला वाव देण्यासाठी आणि खेळांच्या माध्यमातून शरीर व मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. १७) करण्यात आले होते. यावेळी पुणे जनरल पोस्ट ऑफिसमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत असलेल्या मनाली जाधव यांनी 7-8 डिसेंबर रोजी मॉस्को रशिया येथे पार पडलेल्या “कॉमनवेल्थ कप इंटरनॅशनल सुमो टूर्नामेंट-2024” मध्ये ब्राँझ मेडल पटकाविले आहे.
पुणे जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट या पदावर कार्यरत असलेल्या सोनाली तोडकर यांनी महाराष्ट्र राज्याचा “शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार -2023” प्राप्त केला आहे. यावेळी दोघांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पुणे क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे क्षेत्रीय कार्यालयाने कुस्ती सारख्या खेळामध्ये महिलांना उत्तम वाव असून त्या कुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकत असल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना सिमरन कौर म्हणाले की, जीवनात व्यायाम आणि खेळाच्या महत्वाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. खेळाडूंना शुभेच्छा देताना पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी या दोघींच्या कामगिरीचा गौरव केला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी बोलताना सोनाली तोडकर यांनी जीवनातील खेळाचे महत्त्व विषद करून सांगितले. तर खेळावर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी विशेष मेहेनत घेणे आवश्यक आहे, असे मनाली जाधव यांनी सांगितले. या दोघींनी भारतीय टपाल विभागाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्यांना सामावून घेण्याबद्दल आणि कुस्तीच्या सरावासाठी वेळ देण्याबद्दल विशेष धन्यवाद दिले.