हडपसर : आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती अशा अनेक प्रकारच्या आपत्ती निवारण्याचे काम अग्निशमन दल करीत आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडत असतात. या काळात अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवितात. संकटाच्या वेळी त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. असे मत नगरसेवक मारुती तुपे यांनी केले आहे.
हडपसर येथील काळेबो राटे नगर येथे अग्निशमन केंद्र बुधवारी (ता. २७) कार्यान्वित करण्यात आले. यावेळी बोलताना वरील मत नगरसेवक मारुती तुपे यांनी मांडले आहे. यावेळी हडपसर अग्निशमन केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, तांडेल तानाजी आंबेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना तुपे म्हणाले कि, हडपसर परिसरातील नागरिकांना आपत्ती काळात आता लवकर सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपत्तीच्या वेळी तत्काळ अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहनही तुपे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, यावेळी काळे बोराटे अग्निशमन केंद्रामधील तिन्ही पाळीतील जवान उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार अग्निशमन केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले.