राजेंद्र गावडे (संचालक -घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरा, ता. शिरूर)
माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके…!
माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन…
अशा या रसाळ आणि अमृताहुनी गोड मराठीला ज्ञानदेवांनी बहरवली. मायबोली मराठी असे आमुची महान, अशी गोडवा असणारी माझी मराठी भाषा संपूर्ण महाराष्ट्राची मायभाषा आपली मातृभाषा आमच्या भावनांची अभिव्यक्ती, विचारांचे आदान-प्रदान करणारी भाषा आज तिचा हा गौरव दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर २७ फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.
मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी दिन साजरा करावा अशी कल्पना पुढे आली. मराठी भाषा दिवस फक्त या दिवशी साजरा केला जावा असे नाही, तर प्रत्येक दिवशी तो साजरा होणं आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. काही श्रीमंत व सुशिक्षित लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवण्याचा आग्रह धरू लागले आहेत. इंग्रजीतून बोलणे, लेखन करणे अभिमानाची गोष्ट मानली जाऊ लागली आहे. आई-वडिलांना हाक मारताना सुद्धा मुले मम्मी व डॅडी या नावाने हाक मारतात.
याचा अर्थ इंग्रजी भाषा वापरू नये असे नाही. इंग्रजी भाषा एक व्यवहाराची भाषा म्हणून आपण वापरू शकतो परंतु आपली मातृभाषा हिला आपण विसरता कामा नये. संस्कृत भाषेतील भगवद्गगीता निरक्षर, गरीब सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. तिला मराठी भाषेत अलंकृत करून ज्ञानेश्वरांनी रसिकांपर्यंत पोहोचवली आपल्या ज्ञानेश्वरीतून. खरंच ! इतकी मधूर मराठी भाषा कोणाला आवडणार नाही ? कानडीने केला मराठी भ्रतार असे म्हटले जाते. मग आमच्यासारख्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी बाण्याची काय कथा !
आपला व्यवहार आपल्या बहूजन समाजातील प्रजेला व्यवस्थित समजावा म्हणून छत्रपती शिवरायांनी आपला राज्यव्यवहार कोषही मराठीतूनच निर्मिला. त्यांनी छत्रपती म्हणुन स्वत:चा राज्याभिषेक केला आणि सर्व कारभार मराठीतूनच सुरू केला. धन्य ते शिवराय आणि धन्य ती मराठीबोली ! आपल्या महाराष्ट्राला महान संत परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांनी समाजोद्धाराचे महान कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या गवळणी, अभंग, कीर्तने आज देखील घराघरात भजले जातात. समाजातील जाती, परंपरा, रूढी यांचा त्यांनी आपल्या काव्यातून निषेध केला आहे.
शब्दांकन : युनूस तांबोळी