राहुलकुमार अवचट
यवत : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये यवत गावची कन्या श्रद्धा शेळके हिची गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या श्रद्धाची या पदावर निवड झाल्याबद्दल यवत ग्रामस्थ व शेळके परिवाराकडून तिची राहत्या घरापासून श्री काळभैरवनाथ मंदिरापर्यंत मोठ्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात झाले. बारामती येथील कृषी महाविद्यालयात तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली. तिची गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे.
श्रद्धाच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंद साजरा केला. अनेकांनी मिरवणुकीदरम्यान तिचा सत्कार केला. श्री काळभैरवनाथ मंदिर येथे यवत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, गौरव दोरगे यांनी तर गावच्या वतीने ह.भ.प. नाना महाराज दोरगे व बाळासाहेब लाटकर, उत्तम गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश कदम, डॉ. संतोष बडेकर यांनी श्रद्धा शेळके हिचा सन्मान केला.
प्रतिकूल परिस्थितीत देखील श्रद्धाला तिच्या आई-वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. गावातील विद्यार्थ्यांनी श्रद्धाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे मनोगत नाना महाराज दोरगे यांनी व्यक्त केले. या वेळी दोरगे यांच्यासह श्रद्धाचे वडील प्रसाद शेळके व आई वैशाली शेळके यांनी भावनिक झाले होते. बाळासाहेब लाटकर यांनी श्रद्धा शेळके हिची गटविकास अधिकारीपदी व यवत येथे काही काळ मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दुर्गादास शेळके यांचे चिरंजीव रोहित शेळके यांची तहसीलदार पदी नेमणूक झाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. दोघांनीही आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी व पारदर्शक प्रशासन चालवण्यासाठी करावा अशा शुभेच्छा दिल्या.
या वेळी मनोगत व्यक्त करताना श्रद्धा म्हणाली की, आजी-आजोबांनी दिलेल्या प्रेमरुपी पाठबळामुळे, आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांमुळे मी या पदापर्यंत जावू शकले. पद हे मिरविण्यासाठी नव्हे तर सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार आहे. गावातील मान्यवरांचे पाठबळ, सर्व शिक्षकांचा आशिर्वाद व मार्गदर्शन तर आई, वडील, नातेवाईक, मित्रपरिवार यांची प्रेरणा व उच्च शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ मिळाल्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे श्रद्धाने सांगितले.
या वेळी यवत परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, यवत ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, महिला भगिनी, शेळके परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.