संतोष पवार
पळसदेव : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात अराजकीय आंदोलन केले. मागील काही दिवसांपूर्वी अहिल्या अभ्यासिका, शास्त्री रोड येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मंजूर झाल्या होत्या. परंतु काही मागण्या अजुनही प्रलंबित होत्या. आता या आंदोलनाची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून अराजपत्रित गट – ब, गट – क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसात काढण्यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा झाल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसात निवडणुक आचारसंहिता लागणार असल्यामुळे परीक्षांच्या जाहिराती संदर्भात अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर झाल्या नाही तर, पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन करू आणि निर्णयानंतरच आंदोलन स्थगित करू असा इशाराही दिलाय.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?
- MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क 2024 परीक्षेची जास्तीत जास्त जागांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
- MPSC महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ही OBJECTIVE Pattern ची होणारी शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या जास्तीत जास्त असावी. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा महत्वाच्या सर्व 35 संवर्गाच्या पदांचा समावेश असावा.
- जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबीत जाहिरात लवकरात लवकर यावी. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?
- शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रसिध्द करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.