पुणे : हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्त्यव्य बजावीत असलेले सहाय्यक फौजदार बंडू बबन मारणे यांना पोलीस महासंचलक पदक जाहीर झाले आहे. मारणे यांना पदक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना दरवर्षी ” पोलीस महासंचलक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक” प्रदान करण्यात येते. त्याच अनुषंगाने बंडू मारणे यांनी ३० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांना यावर्षीचे पोलीस महासंचलक पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस दलाकडून अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
बंडू मारणे यांचा जन्म मुठा (ता. मुळशी) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील बबन मारणे व आई लक्ष्मीबाई हे दोघेही शेती करून कुटुंबाचा गाडा हाकीत होते. बंडू मारणे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुठा येथे झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातील बाजीराव रस्त्यावर असलेल्या सरस्वती विद्या मंदिरातून पूर्ण केले. दरम्यान, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, बंडू मारणे यांनी लागेल ती नोकरी पहिल्यांदा करायची असा ध्यास घेतला आणि ७ जून 1994 साली पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झाले.
बंडू मारणे हे मागील ३० वर्षापासून पोलीस दलात सेवा बजावीत आहेत. बंडू मारणे हे सन २०१८ मध्ये तळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तेव्हा पुणे ग्रामीण पोलीस दलातून काही पोलीस ठाणे वगळण्यात आली. वगळण्यात आलेली पोलीस ठाणे एकत्र करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्र तयार करण्यात आले.
तळेगाव पोलीस ठाणे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाल्यापासून बंडू मारणे हे तेथे कार्यरत होते. त्यानंतर सन २०२० मध्ये त्यांची हिंजवडी पोलीस ठाण्यात बदली झाली. येथे कर्त्यव्य बजावीत असताना, बंडू मारणे यांनी उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविला. बालेवाडी स्टेडियमच्या परिसरातील दर्ग्याच्या जवळ एका अनोळखी इसमाला जाळून टाकले होते. मृतदेहाची फक्त राख शिल्लक राहिली होती. या खुनाच्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना, बंडू मारणे यांनी कौशल्यपूर्वक तपास करून सर्वात प्रथम मृतदेहाची ओळख पटविली आणि या खुनाचा उलगडा करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सहाय्यक फौजदार बंडू मारणे यांचे होतेय सर्वत्र कौतुक
पुणे (जिल्हा) ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर दलात मागील ३० वर्षापासून बंडू मारणे हे कार्यरत आहे. त्यांनी या कालावधीत गंभीर गुन्हे हाताळून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. नेहमीच गुन्हेगारांना शिक्षा तर गरिबांना न्याय देण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत. त्या कामाची पोच पावती म्हणून बंडू मारणे पोलीस महासंचलक पदक जाहीर करण्यात आले आहे. बंडू मारणे यांना हे पद जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर शासकीय अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.